रांची (झारखंड) – महाराष्ट्रासह भारतातील सर्वच राज्यांत कोरोनाचे संकट गडद होत असून त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य शासन देखील चिंतेत आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणांमार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. याच वेळी झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह अनेक नेतेमंडळींनीही त्यांचे कौतुक केले आहे.
कोरोना काळात डॉक्टर योग्य काम करतात की नाही हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी एका डॉक्टरांना सर्व सामान्य रुग्ण म्हणून फोन केला, तेव्हा डॉक्टर खरोखरच योग्य काम करत असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचे भूमीपुत्र रमेश घोलप सध्या झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदावर असताना अथकपणे कार्यरत आहेत. अतिशय गरिवीतून शिक्षण घेत प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत ते पदावर पोहचले असून त्यांच्या कामात सर्वसामान्य आणि गोरगरीब माणूस नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. सध्या कोरोना कालावधीतही त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरत आहे. नवनवीन योजना राबवत नागरिकांना सेवा उपलब्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सध्या कोरोना महामारीच्या संकटातही रुग्णांची कोविड रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांच्या समस्या जाणून घेणे यांसह प्रशासकीय यंत्रणा कामाला लावणे अशी कामे केली आहेत. नुकतेच त्यांची एक ऑडिओ क्लीप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
कोडरमा जिल्ह्यात होम आयसोलेटेड रुग्णांसाठी त्यांनी टेलीमेडीसीन सेवा सुरू केली आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील 3 डॉक्टरांकडून रुग्णांना घरबसल्या मेडिसीन आणि उपचाराचा सल्ला देण्यात येतो. मात्र, आपले सरकारी डॉक्टर आपलं काम चोखपणे पार पाडतात की नाही? हे पाहण्यासाठी त्यांनी चक्क एका खेड्यातील रुग्ण बनवून फोन केला जिल्हाधिकारी यांच्या या कसोटीत संबंधित डॉक्टर उतीर्ण झाले
दरम्यान, त्यानंतर त्यांनी पुढील काही दिवस आपणा सर्वांना थोडासा ताण सहन करावाच लागेल, असे त्या डॉक्टरांना सांगत, कोरोनाच्या लढाईत न थकता, न रुकता आपण लढायचे आणि जिंकायचे असा मंत्र त्यांनी यावेळी संबंधित डॉक्टरांना दिला आहे. जिल्हाधिकारी रमेश घोलप यांची ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे झारखंडमधील लोकप्रतिनिधींनी रमेश घोलप यांच्या कामाचे कौतुक केले आहे