नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिमेकडील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळेच नाशिकही गारठले आहे. आज पहाटे नाशकात ६.३ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. तर, निफाडमध्ये राज्यातील सर्वात निच्चांकी म्हणजे ४.५ अंश सेल्सिअस एवढे तपमान नोंदले गेले आहे. आगामी काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे.
पश्चिमेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा मोठा प्रभाव उत्तर आणि मध्य भारतावर झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट आहे. नाशिकमध्ये काल किमान तपमान ६.६ आणि महाबळेश्वरमध्ये ६.५ अंश सेल्सिअस एवढे तपमान होते. आज याच किमान तपमानात आणखी घट झाली आहे. त्यामुळे नाशकात ६.३ अंश सेल्सिअस तपमान असल्याचे पहायला मिळाले. तर, महाराष्ट्राचा कॅलिफॉर्निया अशी ओळख असलेल्या निफाडमध्ये ४.५ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे.
राज्यात किमान तपमानाबरोबरच कमाल तपामानातही लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात किमान तपमान हे २० ते २५ अंश सेल्सिअस एवढे असल्याचे पहायला मिळाले. आगामी काही दिवस कडाक्याच्या थंडीची लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. गारठा आणि झोंबणारी थंडी यामुळे नागरिकांना उबदार कपडे दिवसभर घालण्याशिवाय पर्याय नाही. तर, कडाक्याच्या या थंडीत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.