नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुरिअर मार्गाने भारतात अंमली पदार्थ (कोकेन) ची तस्करी करण्याच्या एका नव्या पद्धतीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छडा लावला आहे, ज्यामध्ये कोकेन थर्मोकोल बॉल्समध्ये जाणूनबुजून लपवले होते. याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
डीआरआयला मिळालेल्या विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे, नवी दिल्लीतील न्यू कुरिअर टर्मिनल येथे डीआरआय अधिकाऱ्यांनी आयात वस्तूची कुरिअर खेप रोखून त्याची तपासणी केली, यावेळी 1922 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, ज्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य अंदाजे 26.5 कोटी रुपये आहे .
ही कुरिअरची खेप ब्राझीलच्या साओ पाउलो येथून दोन खोक्यांमधून आली होती आणि त्यात “टेबल सेंटर (सजावटीची वस्तू)” असल्याचे घोषित करण्यात आले होते . मालाच्या प्रथमदर्शनी तपासणीत असे आढळले की दोन खोक्यांमध्ये प्रत्येकी एक काचेचा क्रिस्टल बाऊल होता तसेच सुमारे दोन सेंटीमीटर व्यासाचे हजारो थर्माकोल बॉल होते, जेणेकरून काचेच्या वस्तूंचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये.
थर्मोकोल बॉल्सचे बारकाईने निरीक्षण केल्यावर असे दिसून आले की काही गोळे बाकीच्या गोळ्यांपेक्षा थोडे जड (फक्त 1-2 ग्रॅम) होते. त्यानुसार, वजनाप्रमाणे जड थर्माकोल बॉल वेगळे करण्यात आले , जे एकूण थर्माकोल बॉल्सच्या सुमारे 10% होते. हे जड थर्माकोलचे 972 गोळे कापले असता , त्यात पारदर्शक आणि अगदी पातळ पॉलिथिनने झाकलेले पांढऱ्या भुकटीचे छोटे गोळे लपवून ठेवलेले आढळले. या पांढऱ्या रंगाच्या भुकटीच्या चाचणीत कोकेन असल्याचे आढळले. परिणामी, एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत एकूण 1922 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.