इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना यशस्वीपणे 1.56 कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला. नागरी सेवा, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच इतर शैक्षणिक कार्यक्रमांसाठी कोचिंग केंद्रांमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना सदर केंद्रांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करुनही यापूर्वी त्यांच्या हक्काचा परतावा मिळण्यास नकार देण्यात आला होता.
तक्रारींच्या निराकरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रिया राबवणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या (एनसीएच) माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या तक्रारींवर कारवाई करत हा परतावा मिळवून देण्यात आला. संबंधित विभागाने तातडीने कारवाई केल्यामुळे विद्यार्थ्यांना न मिळालेल्या सेवा, वर्ग घेण्यात विलंब अथवा रद्द केलेले अभ्यासक्रम इत्यादींसाठी नुकसानभरपाई मिळण्यात मदत होऊन या विद्यार्थ्यांना चुकीच्या व्यवसाय पद्धतींमुळे आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही, याची सुनिश्चिती झाली.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने निर्णायक निर्देशात सर्व कोचिंग केंद्रांना विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोन स्वीकारत, विद्यार्थ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांना केंद्रातर्फे परताव्याच्या धोरणांची माहिती स्पष्ट आणि पारदर्शकपणे दिली जाणे अनिवार्य केले आहे. शैक्षणिक संस्थांना ग्राहक हक्कांचे संरक्षण करण्याच्या सूचना देत विभागाने हे स्पष्ट केले आहे की कायदेशीर परताव्याचे दावे नाकारण्याची अन्यायकारक पद्धत सहन केली जाणार नाही.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग सक्रीय प्रयत्नांच्या माध्यमातून तक्रार निवारण यंत्रणा बळकट करण्याप्रती आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्राहक हक्कांबाबत शिक्षित करुन अन्याय्य वर्तणुकीच्या विरोधात कृती करण्यास सक्षम करण्याप्रती वचनबद्ध आहे.
विद्यार्थ्यांना तसेच होतकरूंना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत सक्षम करण्यात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (एनसीएच) अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत ठरला आहे. परताव्यांच्या दाव्यांतील गुंतागुंत सोडवण्यासाठी तसेच तक्रारींचे वेळेवर निराकरण होण्यासाठी एनसीएचची कशी मदत झाली यावर अधिक भर देत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे सकारात्मक अनुभव सामायिक केले आहेत.