नवी दिल्ली : लाभार्थ्यांसाठी को-विन (Co-WIN ) ची विविध उपयुक्तता वैशिष्ठ्ये अद्ययावत ठेवण्यासाठी, CoWIN च्या स्व-नोंदणी पोर्टलमध्ये खालील वैशिष्ठ्ये जोडली गेली आहेत.
अ) Co-WIN वर नोंदणी – ४ सदस्यांच्या विद्यमान मर्यादेऐवजी, आता ६ सदस्यांना Co-WIN वर एका मोबाईल क्रमांकाचा वापर करून नोंदणी करता येईल.
ब ) लसीकरण स्थितीत बदल – Co-WIN खात्यात ‘रेझ अँन इशू’ अंतर्गत एक नवीन उपयुक्तता वैशिष्ठय जोडले गेले आहे, ज्याद्वारे लाभार्थी त्याची वर्तमान लसीकरण स्थिती (vaccination status) पूर्ण लसीकरणापासून अंशत: लसीकरण किंवा लसीकरण झालेले नाही, या स्थितीपर्यंत आणि अंशतः लसीकरण ते लसीकरण झालेले नाही, या स्थितीतही मागे घेऊ शकतो. लाभार्थ्यांच्या लसीकरण डेटाच्या अद्ययावतीकरणात लसीकरणकर्त्याद्वारे अनावधानाने डेटा एन्ट्री त्रुटींमुळे निर्मित लसीकरण प्रमाणपत्रांच्या तुरळक प्रकरणांमध्ये लसीकरणाची स्थिती लाभार्थींद्वारे दुरुस्त केली जाऊ शकते. ‘रेझ अँन इशू’ युटिलिटीद्वारे ऑनलाइन विनंती सादर केल्यानंतर बदल होण्यासाठी ३-७ दिवस लागू शकतील. अशा लाभार्थ्यांना लसीची देय मात्रा मिळू शकते. सध्याच्या प्रमाणित मार्गदर्शक सूचनांनुसार प्रणालीमध्ये नवी लसीकरण स्थिती यशस्वीरीत्या अद्ययावत झाल्यानंतर जवळच्या लसीकरण केंद्रात लसीची मात्रा घेता येऊ शकेल.