नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणेस्थित महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) या शहरी भागांतील गॅस वितरण कंपनीने नाशिक व धुळे जिल्ह्यातील भौगोलिक भागांत वाहनांसाठीच्या सीएनजीची (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) किरकोळ विक्री किंमत रू 3.40 प्रति किलो ग्रॅमने कमी केली आहे. ही दरकपात दि. 16/17 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजीची किरकोळ विक्री किंमत पूर्वीच्या रू. 95.90 प्रति किलो ग्रॅम वरून रू. 92.50/- प्रति किलो ग्रॅम इतकी कमी केली आहे.
या दरकपातीनंतर, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे सीएनजी दर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत प्रवासी चारचाकी वाहनांसाठी अनुक्रमे सुमारे 47% आणि 24% ची आकर्षक बचत देतील आणि ऑटोरिक्षांसाठी स्पर्धात्मकता व उत्तम मायलेज यांमुळे सुमारे 24% इतकी बचत देतील. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने घरगुती नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने सीएनजीच्या दरात ही कपात केली आहे. कंपनीने कमी झालेल्या गॅसच्या किमतीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा गॅस ॲथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम असून त्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) मार्फत महाराष्ट्र सरकारचा सहसमभाग आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही कंपनी पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच हिंजवडी, चाकण आणि तळेगाव यासह महाराष्ट्रातील धुळे, नाशिक व सिंधुदुर्ग जिल्हा, गुजरातमधील वलसाड (आधीचे अधिकृत क्षेत्र वगळता), धुळे, नाशिक जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि कर्नाटकातील रामनगर या भौगोलिक क्षेत्रांतील एक प्रमुख शहर गॅस वितरण कंपनी आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड स्वच्छ, पर्यावरणपूरक हरित इंधन पुरविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रांसाठी पाईप्ड गॅस आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी सीएनजी गॅस पुरवून समाजासाठी योगदान देत आहे.
CNG Rate Reduced by MNGL in Nashik and Dhule