नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीएनजी-पीएनजीच्या आणि घरगुती वापराच्या सिलींडरच्या सातत्याने वाढत्या किंमती ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने केंद्र सरकारने सीएनजी व पीएनजीच्या दरात घट करण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महानगर गॅस लिमिटेड आणि अदानी टोटल गॅसने दरात घट केली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
नवीन फॉर्म्युलामध्ये दोन वर्षांसाठी कमाल मर्यादा कायम राहणार आहे. त्यानंतर प्रति ब्रिटिश थर्मल युनिट ०.२५ डॉलरची वार्षिक वाढ होईल. सीएनजी-पीएनजीचे दर आता दर महिन्याला निश्चित होतील. सध्या दर सहा महिन्यांनी दर निश्चित केले जातात. गॅस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त उत्पादनावर २० टक्के प्रीमियम देण्याचा प्रस्ताव आहे.
विद्यमान उत्पादकांनी गॅस उत्पादन वाढविल्यास घोषित किमतीव्यतिरिक्त त्यांना २० टक्के प्रीमियमच्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे उत्पादकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास केंद्र सरकारला आहे. पारीख समितीनेही गॅस जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे. यामध्ये गॅसवर तीन टक्के ते २४ टक्के असा सर्वसाधारण कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे गॅस मार्केटला चालना मिळण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
महानगर गॅस आणि अदानीचे दर आजपासून असे
शासनाच्या या निर्णयानंतर महानगर गॅस लि. त्याच्या वितरण क्षेत्रात सीएनजीच्या किमती ८ रुपयांनी कमी केल्या आहेत. पीएनजीची किंमतही प्रति एससीएम ५ रुपयांनी कमी झाली आहे. अदानी टोटल गॅसनेही शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात ८.१३ रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात ५.०६ रुपयांनी कपात केली आहे.
नव्या फॉर्म्युल्यामुळे सीएनजी-पीएनजीच्या किंमती दहा टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामागचे गणित केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. ‘पारंपरिक क्षेत्रातून तयार होणारा नैसर्गिक वायू आता अमेरिका-रशियाप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतींशी जोडला जाणार आहे. यापूर्वी गॅसच्या किंमतींच्या आधारे दर निश्चित व्हायचे. आता एपीएम गॅसची किंमत भारतीय बास्केटमधील कच्च्या तेलाच्या किंमतींच्या १० टक्के असेल. ही किंमत प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट ६.५ डॉलरपेक्षा जास्त असणार नाही. मूळ किंमत ४ युनिट प्रति डॉलर ठेवण्यात आली आहे. सध्याची गॅस किंमत ८.५७ डॉलर आहे, असे ते म्हणाले.
https://twitter.com/drharshvardhan/status/1644053724099387392?s=20
CNG PNG Rates Reduced Mahanagar Gas Adani Total