इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या ठिकाणाजवळ भटक्या जनावरांना सोडण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ खोटा असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एसपी अनुराग वत्स यांनी एका हिंदी वृत्तपत्राला सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली असून हा व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट असल्याचे आढळून आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळाजवळ अशी कोणतीही घटना घडली नाही.
मुख्यमंत्री योगींची बाराबंकीमध्ये रॅली होती. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, जो घटनास्थळाच्या आसपासचा असल्याचे सांगण्यात आले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी मैदानात शेकडो गायी आणि बैल सोडून दिल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याविषयी एसपी वत्स यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, “व्हायरल क्लिपमध्ये एका शेतात मोठ्या संख्येने बैल दिसत होते. गौरा सालक येथील मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेजवळ हे बैल शेतकऱ्यांनी सोडल्याचे व्हीडिओतून सांगण्यात आले. तसेच, उत्तर प्रदेश सरकारच्या आयपीआरडीअंतर्गत तथ्य-तपासणी करणार्या ट्विटर हँडलद्वारे हे देखील स्पष्ट केले गेले आहे की काही सोशल मीडिया खात्यांद्वारे, मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत भटकी जनावरे सोडत असलेल्या शेतकऱ्यांचे फोटो / व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, रॅलीच्या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडली नसून, ही बातमी निराधार आणि असत्य आहे. लोकांनी सोशल मीडियावर अशी दिशाभूल करणारी माहिती पसरवणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
योगी आदित्यनाथ याविषयी म्हणाले की, यूपीमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी आणि दुसरा निर्णय मुलींच्या सुरक्षेसाठी घेतला गेला. कत्तलखान्यात गुरांची कत्तल होऊ दिली नाही, तर शेतकऱ्यांच्या पिकांचीही नासाडी होऊ देणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला होता. त्यासाठी ठिकठिकाणी गोशाळे बांधण्यात आली असून यापुढे शेतकऱ्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी सभेत दिले.