मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्ष म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे वारंवार दिसून येते. तिन्ही पक्षातील राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेळप्रसंगी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. त्यांच्यात परस्पर मतभेद असल्याची माहिती रोजच समोर येत आहेत. त्यातच काँग्रेसच्या २५ आमदारांनी थेट सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र धाडले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे,
त्यातच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपबाबतच्या मवाळ भूमिकेमुळे उद्धव ठाकरे चिंतेत असून त्यांनी याप्रकरणी शरद पवार यांच्याशीही चर्चा केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याचेही ते म्हणाले. अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, असे अनेक प्रसंग असे येऊन गेले जेव्हा राष्ट्रवादीने भाजपवर हल्ला करायला हवा होता, परंतु तो बॅकफूटवर आला. ही बाब उद्धव यांना सतावत आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर विंग केबीसी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते, मात्र मुंबई पोलिसांनी १३ मार्च रोजी आपला निर्णय फिरवला. यानंतर पोलिसांनी फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांचे जबाब घेतले. गृहमंत्रालयाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेत्याकडे असून पोलीस खाते या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
तसेच नवाब मलिकच्या अटकेनंतर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही बाजूंनी शांतता राखण्याची वेळ आली आहे, असे म्हणाले अशा अनेक घटनांचा उल्लेख शिवसेनेने केला आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1509439915091582977?s=20&t=5M8SAPcI2z3X-1JAS_lCbA
गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना सभापतींशी बाचाबाची केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्यावर अजित पवार म्हणाले होते की, आमदारांना काही तास किंवा काही दिवस शिक्षा होऊ शकते, पण त्यांना वर्षभरासाठी निलंबित करणे योग्य नाही.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी नुकतेच ट्विट करून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि जनतेने नरेंद्र मोदींना जनादेश दिल्याचे म्हटले आहे. त्याच्यात काही चांगले गुण असले पाहिजेत ज्याची विरोधकांना कल्पना नाही, असेही ते म्हणाले. अशा अनेक प्रसंगांमुळे शिवसेनेला चिंता वाटत असून राष्ट्रवादीने आपली कठोर भूमिका स्पष्ट करीत भाजप पासून दूर राहावे असे देखील शिवसेना नेत्यांना वाटते आहे.