मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतील बंडखोरीमुळे अत्यंत अडचणीत आलेले शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना बाधित झाल्याची बाब समोर येत आहे. विशेष म्हणजे आज त्यांनी शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक मातोश्रीवर बोलवली होती. राज्यातील नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा काय असावी याची चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार होती. मात्र, आता ही बैठक होणार की नाही आणि झाली तरी ती ऑनलाईन पद्धतीने होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे महत्त्व वाढले आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तातडीने ते उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. म्हणजेच, राज्यात गतिमान घडामोडी घडत असताना दोन्ही महत्त्वाच्या व्यक्ती कोरोना बाधित झाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्रासाठीचे पक्ष निरीक्षक कमलनाथ यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असे सांगितले जात आहे. मात्र, तेही कोरोना बाधित आहेत तर राज्यपालही कोरोना उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे अशा स्थितीत राजीनामा दिला जाणार का आणि तो स्विकारला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
cm-uddhav-thakre-and-governer-bhagat-singh-koshyari-corona-positive