विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले आहे. हे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणासह राज्यातील महत्त्वाचे विषयाबाबत चर्चा होणार आहे.
शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. पंतपधानांची भेट मिळावी यासाठी पंतप्रधान कार्यालयाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी विनंती केली होती. त्यांची ही विनंती पंतप्रधान कार्यालयाने मान्य केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होणार आहे. या भेटीत घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
१६ जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी जाहिर केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसोबतची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत या प्रश्नावर काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.