नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे आमदार नाराज असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची डळमळीत आहे का, असा प्रश्नही त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) चा अध्यक्ष बनवण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जात असताना आझाद यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसमध्ये सर्वसमावेशक आणि सामुहिक नेतृत्व असण्याची मागणी करणाऱ्या असंतुष्ट नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे.
भाजपशी सामना करण्यासाठी विरोधी पक्षांची मोठी एकता असण्याची गरज असल्याचे काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांचे मत आहे. बुधवारी झालेली ही भेट सामान्य होती अशी माहिती एनसीपीने दिली आहे. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना गुलाम नबी आझाद नेहमीच शरद पवार यांची भेट घेतात. त्यामुळे त्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.
काँग्रेसचे अनेक आमदार राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी नाराज आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. काँग्रेसचेच मंत्री ऐकत नसल्याची तक्रार आमदारांनी केली आहे. विशेषतः आमदारांची सर्वाधिक नाराजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आहे. ग्रामीण भागात वीजेची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
राज्यात किमान २५ काँग्रेस आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांच्याच पक्षाचे मंत्री त्यांच्या प्रश्नांचे उत्तरे देत नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी त्यांनी मागणी केली आहे.
पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे सांगत आमदार म्हणाले, काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्यांला त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला संबोधित करण्यासाठी पक्षाच्या तीन नेत्यांकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे, ही बाब त्यांना गेल्या आठवड्यात ठाऊक झाली होती. एच. के. पाटील यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. त्यात काँग्रेसच्या तीन मंत्र्यांना तीन आमदार देण्यात आल्याचे आम्हाला कळाले, असे एका आमदाराने सांगितले.