इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमध्ये वेगाने राजकीय घटनाक्रम बदलत आहेत. राज्याचे मंत्री मुकेश सहानी यांना मंत्रिमंडळातून पदमुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या पत्रानुसार, राज्यपाल फागू चौहान यांना सहानी यांना मंत्रिमंडळातून पदमुक्त करण्याची शिफारस केली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवर मोहोर उमटवली आहे. तथापि, रात्री उशिरापर्यंत राजभवनाकडून माध्यमांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सहानी यांना भाजपच्या शिफारशीमुळे मंत्रिपद लाभले होते. भाजपकडून मुख्यमंत्र्यांना सहानी यांना पदमुक्त करण्याबाबत दोन पत्र मिळाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल आणि भाजप विधिमंडळ दलाचे नेते तसेच उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी)चे तिन्ही आमदार आता भाजपमध्ये आले आहेत. ते भाजप विधिमंडळ पक्षात विलीन झाले आहेत. त्यामुळे व्हीआयपीकडे आता एकही आमदार शिल्लक राहिला नाही. तसेही व्हीआयपी हा एनडीएचा सदस्य नाही. त्यामुळे मुकेश सहानी यांना पदमुक्त करण्यात यावे, अशी शिफारस त्यांनी पत्राद्वारे केली. भाजपच्या या दोन्ही पत्रांनंतर मुख्यमंत्र्यांनी व्हीआयपी प्रमुख सहानी यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे.
२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये जागावाटप झाले होते. पहिल्या टप्प्यातील जागा वाटपानंतर व्हीआयपीची भाजपसोबत आणि हमची जदयूसोबत युती झाली. एनडीच्या या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या वाट्यातील जागा व्हीआयपी आणि हम या पक्षांना दिल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नाने व्हीआयपीशी भाजपची युती झाली. आता बोचहां येथील पोटनिवडणुकीत मुकेश सहानी यांनी आपला उमेदवार उभा केला. भाजपच्या कोट्यातून मंत्रिमंडळात राहूनही ते त्यांच्या उमेदवाराविरोधात मंत्री म्हणून प्रचारात उतरले असते, तर विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती. त्यापूर्वीच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली आहे.
व्हीआयपी प्रमुख मुकेश सहानी यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी २० मार्चलाच निश्चित करण्यात आली होती. त्याच दिवशी सायंकाळी केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि बिहारचे भाजपचे वरिष्ठ नेते नित्यानंद राय यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेत्यांचे सहानी यांच्याबद्दलचे मत नित्यानंद राय यांनी मुख्यमंत्र्यांना भेटीदरम्यान कळवले होते.
त्यानंतर २३ मार्च रोजी विधिमंडळ अधिवेशनानंतर भाजप अध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल, उपमुख्यमंत्री ताराकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्यासोबत जाऊन राजू सिंह, स्वर्णा सिंह आणि मिश्रीलाल यादव या व्हीआयपीच्या तीन आमदारांनी विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांच्याकडे भाजपला पाठिंबा देण्याचे पत्र दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी तिन्ही आमदरांना भाजपमध्ये विलीन होण्यास मंजुरी दिली. रात्री उशिरा तिघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.