कोलकाता – पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दणदणीत विजय मिळवत नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला. ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा ५८,८३२ मतांनी पराभव केला. २०११ रोजी त्यांनी मिळविलेल्या विजयापेक्षाही हा विजय मोठा आहे.
प्रियंका टिबरेवाल यांना २० हजारांहून कमी मते मिळाली. डाव्या पक्षाचे श्रीजिब हे खूपच पिछाडीवर पडून तिसर्या स्थानावर राहिले. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानाबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
मतमोजणीच्या २१ फेर्यांमध्ये ममता बॅनर्जी प्रियंका टिबरेवाल यांच्या खूपच पुढे होत्या. या विजयामुळे ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्रिपद वाचले आहे. गुरुवारी झालेल्या मतदानानंतर ममता बॅनर्जी यांचा ५० हजार मतांनी जिंकतील असा दावा टीएमसीने केला होता. हा दावा खरा ठरला आहे. भवानीपूर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे.
पश्चिम बंगामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम जागेवर पराभव झाला होता. मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी त्यांना पोटनिवडणुकीत विजय मिळविणे आवश्यक होते. सहा महिन्यांच्या मुख्यमंत्र्यांना विधानसभेत आमदार होणे आवश्यक होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.