नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी लस, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि औषधांची मागणी केली आहे. लवकरात लवकर मदत पाठवावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसाठी ममता बॅनर्जी यांनी भाजपला जबाबदार ठरवले आहे. ममता बॅनर्जी पत्रामध्ये लिहितात, राज्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. निवडणूक प्रचारासाठी तसेच इतर कारणांमुळे काही राजयकीय पक्षांचे लोक बाहेरून येत आहेत. या परिस्थितीत महामारीला रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करणे गरजेचे आहे. या तीन मुद्द्यांवर आपल्या हस्तक्षेपाची गरज आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण सर्वाधिक महत्त्वाचे आहे. विशेषकरून लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या कोलकातासारख्या शहरांमध्ये लसीकरणाची खूप गरज आहे. दुर्दैवाने केंद्र सरकारडून आम्हाला लशींचा पुरवठा खूपच कमी आणि अनिश्चित होत आहे. या गोष्टींमुळे आमच्या लसीकरण अभियानावर नकारात्मक परिणाम होत आहे. आम्ही आतापर्यंत २.७ कोटी लोकांना लसीकरण केले असून, अजून ५.४ कोटी डोसची गरज आहे.
रेमडेसिव्हिर आणि टोसिलिजुमॅबसारख्या औषधांचा पुरवठासुद्धा करावा असा आग्रह त्यांनी केला आहे. राज्याला ६ हजार रेमडेसिव्हिर आणि एक हजार टोसिलिजुमॅबच्या कुपींची गरज आहे. परंतु सध्या दररोज एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत आहेत. तर टोसिलिजुमॅबचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे या औषधांचा त्वरित पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.