कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक लागणार ? या प्रश्नावरील चित्र आता स्पष्ट होत आहे. ऑक्टोबरमध्ये दुर्गापूजेपूर्वी राज्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी बैठकीदरम्यान राज्य सीईओ कार्यालयाच्या अधिका-यांनी दुर्गापूजेच्या आधी पोटनिवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी बुधवारी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी, निवडणूक उपायुक्त सुदीप जैन आणि मुख्य निवडणूक अधिकार्यांसोबत बैठक घेतली. राज्यात निवडणूक घेण्यासाठी योग्य वातावरण आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी बैठक घेण्यात आली. राज्यात कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. दुर्गापूजेआधी निवडणूक घेणे योग्य असल्याचे अधिका-यांनी आयोगाला पटवून दिले आहे.
पश्चिम बंगालमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक झाली होती. राज्यात सात जागा अजूनही रिक्त आहेत. संबंधित उमेदवारांचे निधन झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान नंदिग्राम विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. परंतु यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण तरीही त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यात आमदार बनणे आवश्यक आहे. ममता बॅनर्जी यांचे पद वाचविण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून राज्यात पोडनिवडणूक घेण्याची मागणी करण्यात येत आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत त्यांना लोकांमधून निवडून येणे अनिवार्य आहे. दहा ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत सणांचा काळ आहे. त्यादरम्यान निवडणूक घेणे अशक्य आहे. त्यामुळे राज्यात सण-उत्सवाच्या आधीच पोटनिवडणूक घ्यावी, अशी विनंती राज्याच्या अधिकार्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.