मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आज गुरुवार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. एकूण पाच हजार ६५७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा यात समावेश आहे.
कुंभमेळ्यानिमित्त सुरू होणाऱ्या विविध विकास कामांमुळे नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. या कामांमुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा बळकट होऊन रोजगाराला चालना मिळणार आहे. ठक्कर मैदान, एबीबी सर्कल, त्र्यंबक रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थित राहील.
नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील (ग्रामीण) यांनी केले आहे.








