नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून यापूर्वीच पदवी मिळवलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता विद्यापीठाच्या वतीने वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे पदविका प्रमाणपत्र काल कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. हा पदविका शिक्षणक्रम मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये विशेष प्राविण्यासह अर्थात ७७.२५ टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु पाटील यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाचे मुंबई विभागीय केंद्र संचालक डॉ. वामन नाखले उपस्थित होते. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाची बी.ए. पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रमही विशेष प्राविण्यासह पूर्ण केला आहे.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लौकीकात मुख्यमंत्री शिंदे यांच्या या यशाने भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना करताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
CM Eknath Shinde YCMOU Degree