मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील जाहीर सभेत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर, गुवाहाटीवरुन परत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी ठाकरे यांना कडक इशारा दिला आहे. फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यापुढे काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप आणि वादंग सुरूच आहे, त्यातच ‘खोके ‘ या शब्दाला तर खूपच महत्त्व आले आहे. तसेच वारंवार खोक्यांचा उल्लेख होताना दिसून येतो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे भाषणात केलेल्या आरोपांनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
सुमारे ४ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर खोक्यांवरुन शिंदे गटाला टार्गेट केले जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, बुलडाण्याच्या सभेत खोक्यांचा पुनरुच्चार केला. तसेच फ्रीजमधून खोके गेल्याचे म्हटले. मुख्यमंत्री शिंदे यांनी याला लगेच प्रत्युत्तर दिले आहे. फ्रिजमध्ये भरून खोके कुठे गेले? या प्रश्नावर शिंदे यांनी म्हटले की, त्याचा मी शोध घेतो आणि नंतर बोलतो. मात्र, मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? मोठ खोके, फ्रिजभरून खोके, कंटेनर एवढे खोके कुणाकडे जाऊ शकतात? हे खोके कोण पचवू शकते? हे महाराष्ट्राला माहीत आहे. एक दिवस ते महाराष्ट्राच्या समोर येईल, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीमध्ये जात कामाख्या देवीचं दर्शन घेतले. यावेळी कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर शिंदेंनी खोक्यांच्या मुद्यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांना कडक इशारा दिला आहे. यावेळी खोक्यांच्या मुद्याबाबत बोलताना, आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल. याबाबत केसरकर यांनी सूचक विधान केलेले आहे. आता सगळ्या जगाला माहिती होईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
दुसरीकडे चिखली येथे काल उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर टीका केली. खरेच तुम्ही खोके घेतले असतील तर त्यातील थोडे शेतकऱ्यांना देखील द्या. तुम्ही खोके घेतलेत हे मी म्हणत नाही, तर उलट तुमच्याच गटाचे आमदार सांगत आहेत. बच्चू कडू यांनी देखील सांगितले की लग्नाला गेलो तरी नागरिक खोक्यावरून बोलतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यांच्या सभेनंतर लगेच दीपक केसरकर यांनी खोके कोठे गेले हे वेळ आल्यावर सांगू असा इशारा दिला होता. खोटे बोलण्याची मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडू नका. नाही तर आम्ही देखील तोंड उघडू आणि फ्रिजच्या बॉक्समधून कोठे काय गेले हे बाहेर काढू, असे केसरकर यांनी म्हटले होते. तर दुसऱ्या बाजुला या खोका प्रकरणाला नागरिक कंटाळले आहेत तर नागरिकांना विकासावर चर्चा हवी आहे, असे मत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
CM Eknath Shinde Threat to Uddhav Thackeray