मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या पक्षात फूट पडली की मग वाद आणि भांडणे वाढत जातात आणि वाद विकोपाला जातात. सध्या शिवसेना पक्षात फूट तथा बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही बाजुंच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांचा उल्लेख सातत्याने ‘गद्दार’ असा केला जात आहे. इतकेच नव्हे तर ५० खोके (कोटी) घेऊन गद्दारी केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका, असं त्यांनी उद्धव ठाकरेचे नाव न घेता म्हटलं आहे.
आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली आहे. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. वयाच्या १६ व्या वर्षापासून आम्ही शिवसेना वाढीसाठी मेहनत करतो आहे. तुम्ही आमचे आईबाप काढता. आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो, कधी आमच्या मुलाबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही वर्षातून दोन दोन, तीन तीन वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके शिवसेना करत राहिलो, असं शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आम्ही कधी वेळ-काळ बघितला नाही, दिवस-रात्र बघितली नाही. शिवसेना अशीच मोठी झाली आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांमधून शिवसेना मोठी झाली. आरोप-प्रत्यारोप करणं माझा स्वभाव नाही. परंतु आम्ही गद्दारी केली, विश्वासघात केला, असे आरोप झाले.”
खरे म्हणजे भाजपा-शिवसेना युतीने निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला कौल दिला. त्या लोकांसोबत सत्तास्थापन करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का? विश्वासघात आम्ही केला का? हा विचार करण्याची आवश्यकता आहे,” असंही शिंदेंनी नमूद केलं. शिंदे गटाच्या आमदारांवर गद्दारी केल्याच्या आरोपांबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी कोणी केली? बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो, त्यांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? आपल्याला मत देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कोणी केली? हे सर्व आम्ही बोलू शकतो. सध्या मी सज्जन भाषेत बोलत आहे. पण यावर मी नक्की बोलणार आहे. खोके कुठे जातात? आणि कोण-कोठे गद्दारी करतो? हेही मला माहीत आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे. पण मला काम करायचं आहे. मला कामाने उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. त्यांनीही मला बोलायला भाग पाडू नये, एवढीच माझी इच्छा आहे” असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी आपल्या विचारांशी आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी त्यांनी सत्तेला लाथ मारण्याचं काम केलं. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही जवळ करता येणार नाही. त्यांना जवळ करण्याची जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी माझं दुकान म्हणजेच शिवसेना पक्ष बंद करेन, अशी रोखठोक भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून आपण शिवसेना मोठी केली. आहोरात्र सर्वजण झिजले, म्हणून देशात शिवसेना मोठी झाली.
बाळासाहेबांनी कधीही आपल्या भूमिकेशी प्रतारणा करण्याचं काम केलं नाही. अनेक प्रसंग आले पण ते आपल्या विचारांवर ठाम राहिले. पण दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार स्थापन करावं लागलं. शिवसेना-भाजपा युती म्हणून आम्ही निवडणुका लढवल्या. लोकांनी आम्हाला बहुमत दिलं. आपल्याला कधीही वाटलं नव्हतं, ते सगळं घडलं. तरीही एक कार्यकर्ता म्हणून आम्ही पक्ष नेतृत्वाचे आदेश मानायचं काम केलं. दरम्यानच्या काळात शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी सत्ता चालवणारे वेगळेच होते, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.
CM Eknath Shinde Threat to Uddhav Thackeray
Politics Rebel Shivsena