वर्धा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोंधळाविना आजवर एकही साहित्य संमेलन झालेलं नाही. विशेषतः गेल्या दहा वर्षांमध्ये तर मुळीच नाही. वर्धा येथे सुरू असलेले संमेलनही याला अपवाद ठरणे शक्य नव्हते. शुक्रवारी वर्धा येथे ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना विदर्भवाद्यांनी गोंधळ घालून ही परंपरा कायम राखली.
वर्धा येथे संमेलनाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अध्यक्षपदाच्या मुद्यावरून वाद रंगला आणि आज प्रत्यक्ष उद्घाटन सोहळ्यातच गोंधळ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना महिला व पुरुषांचा एक मोठा समूह उभा झाला आणि वेगळा विदर्भ झाला पाहिजे, शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे, बेरोजगारी संपली पाहिजे अश्या घोषणा देऊ लागला. या समूहातील महिला जास्त आक्रमक झाल्या होत्या. पोलिसांनी लगेच आंदोलकांना शांत करण्यासाठी धाव घेतली आणि यातील तिघांना अटकही केली. आता संमेलनाचे नुकतेच उद्घाटन झाले होते आणि आंदोलकांनी घोषणाबाजी करून संमेलन चर्चेत आणले. आंदोलकांनी व्यासपीठाच्या दिशेने कागदं भिरकावली आणि शेतकरी आत्महत्येच्या मुद्याकडेही सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम केलं.
सर्वांचं ऐकून घेऊ – मुख्यमंत्री
तिकडे काही लोकांना बोलायचं आहे. आम्ही प्रत्येकाचं ऐकूण घेणार आहोत. आमचं सरकार हे जनसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळे संयम राखा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान केले. वेगळ्या विदर्भाच्या घोषणा सुरू झाल्यामुळे मुख्यमंत्रीही काहीक्षण गोंधळले होते.
मुख्यमंत्र्यांनी कामाचं बोलावं
विदर्भात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, बेरोजगार तरुण आत्महत्या करीत आहेत आणि इकडे मुख्यमंत्री आपले राजकीय शौर्य सांगत आहेत. आपण मुख्यमंत्री कसे झालोत, हे सांगण्यापेक्षा जनतेच्या हिताचं, जनतेच्या कामाचं बोलावं, असे आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
https://twitter.com/mieknathshinde/status/1621416240098201601?s=20&t=8l9AptltJDZb_neUBrh_MQ
CM Eknath Shinde Speech Sahitya Sammelan Chaos