सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या सातारा येथील मूळगावी गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्याची राज्यभरात चर्चा आहे. मुख्यमंत्री हे तीन दिवसांच्या रजेवर गेल्याच्या चर्चाही रंगल्या. राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या वार्तांनंतर आता मुख्यमंत्री अचानक रजेवर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, गावी गेलेले मुख्यमंत्री प्रत्यक्षात वर्क फ्रॉम होम करीत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला. मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून त्यांचा नियमित निपटारा करण्यात येतो.
सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला आणि त्या अनुषंगाने संबंधितांना सूचनाही दिल्या. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1651101798609088513?s=20
CM Eknath Shinde Satara Tour Work From Home