मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प अचानक गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तत्कालिन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच तोफ डागली आहे. आता या प्रकरणी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज्य सरकारला या प्रश्नी धारेवर धरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करीत हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलाच कसा, असा सवाल विचारला आहे. अखेर आता याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तर द्यावे लागले आहे.
आमच्या नव्या सरकारने वेदांता फॉक्सकॉनला तळेगावजवळ ११०० एकर जमीन देऊ केली होती. ३५ हजार कोटींच्या सबसिडी ऑफर केल्या. ‘पण आधीच्या २ वर्षांत प्रतिसाद कमी पडला असावा…’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारवरच जबाबदारी ढकलली आहे. मात्र या कंपनीने महाराष्ट्राला प्रथम पसंती दिली होती. तसा अहवालही कंपनीच्या वतीने तयार करण्यात आला. महाविकास आघाडी सरकार असताना उद्योग विभागाशी बोलणी सुद्धा अंतिम टप्प्यात होती. तसेच प्रकल्पाची जागा निवडीसाठी एकुण १०० मुद्दांचा विचार करून ‘वेदांत’ ग्रुपकडून तळेगांवातील टप्पा ४ ही जागा अंतिम करण्यात आले होती.
तळेगांवातील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ॲटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, जेएनपीटी बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने या कंपनीने तळेगांवात एक हजार एकर जागेची निवडही केली असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे आमच्या पुर्वीच्याआघाडी सरकारच्या कारभारावर शंका घेऊ नका असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचं सरकार येऊन दोनच महिने झालेत. पण गेल्या दोन वर्षांत वेदांता फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला गेला असावा, अशी शंका शिंदे उपस्थित केली आहे.
‘वेदांता’ ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला जाण्याच्या वाटेवर असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणुक राज्यात होणार होती. याप्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार होता. हा प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीकडून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा करण्यात आली होती.
CM Eknath Shinde Reaction on Vedanta Project in Gujrat