नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून आज त्यांचे येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. भाजप पक्षश्रेष्ठींचे त्यांना बोलवणे आले. त्यामुळे ते दिल्लीत दाखल झाले आहेत. सत्ता स्थापन झाल्यापासून त्यांची ही सहावी दिल्लीवारी आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेने ते गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत.
दिल्लीत आगमनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार (दि.७) रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ७ व्या बैठकीत सहभागी होणार आहेत. भंडारा व गोंदिया येथील महिला अत्याचार प्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
शिवसेनेतील अंतर्गत कलह आणि राज्यातील सत्तासंघर्षाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप श्रेष्ठींकडून हिरवा कंदिल दिला जात नाहीय. मात्र, त्यामुळे शिंदे यांची मोठीच अडचण जाली आहे. मुख्यमंत्री या नात्याने त्यांना दररोज मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. शिंदे गटातील आमदारांकडूनही त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे सांगितले जाते. तसेच, शिंदे गटातही अस्वस्थता आहे. आता दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्याचे त्यांनी निश्चित केल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने त्यांना कितपत यश येते हे त्यांच्या दिल्ली दौऱ्यातून परतल्यावर स्पष्ट होणार आहे.
CM Eknath Shinde Reach Delhi for two Day Visit