मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरच्या हिंसाचाराबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवली. मात्र, या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आणि शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमाला हजर झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र, मराठा मंदिर संस्थेचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. असे शिंदे यांच्यावतीने सांगण्यात येत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात उदात्त हेतूने मराठा मंदिर ही संस्था सुरू झाली. या संस्थेतील सदस्यांची एकनिष्टता,कामातील सातत्य आणि समाजाप्रति असलेले उत्तरदायित्व यामुळे मराठा मंदिर सारख्या संस्थेने विश्वास संपादन करून महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे. मराठा मंदिर गौरवशाली इतिहास असलेली संस्था आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार भाई जगताप, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख,संजय राणे,शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे यासह मराठा मंदिर या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांच्या सह अनेक सदस्यांनी आपल्या कार्यातून उभी राहिलेली ही संस्था आज बहरली आहे. या संस्थेच्या विकासासाठी सर्वोतोपरी शासनाकडून सहकार्य केले जाईल. आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा या काळात आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून सांगणाऱ्या, स्वातंत्र्याचा अर्थ शिकवणाऱ्या संस्थांची गरज होती. ती गरज मराठा मंदिर सारख्या संस्थांनी पूर्ण केली. आपल्या समाजमनाची मशागत केली. समाजाचा विश्वास संपादन करून, आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. यातील मराठा मंदिर सारख्या संस्थांचे योगदान मोठे आहे. या संस्थांनी महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरने मुंबईसह, सोलापूर, सांगली, रत्नागिरी अशा विविध प्रांतात आपल्या शैक्षणिक कार्याचे जाळे उभे केले आहे. मराठा मंदिर च्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच मराठा मंदिरची ही दिमाखदार शैक्षणिक वाटचाल यापुढेही अशीच सुरु राहील, हा विश्वास आहे. मराठा मंदिर च्या अमृत महोत्सवी वाटचालीस, आणि या निमित्ताने आयोजित सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.
मराठा मंदिरच्या माध्यमातून परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करणार : मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार
मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, संस्थेत निःस्वार्थी काम करणाऱ्या पदाधिकारी यांच्यामुळेच संस्था ही मोठी होते. मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांचे कार्य मोलाचे आहे. रत्नागिरी येथे नव्याने सुरू करण्यात येणारे सागरी संशोधन महाविद्यालय यासाठी लागणारी परवानगी तसेच संस्थेच्या इतर काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शासनाचे सहकार्य आवश्यक आहे. मराठा मंदिर या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी परदेश शिष्यवृत्ती सुरू करणार असून यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्याची जबाबदारी मी घेत आहे. या संस्थेची वाटचाल अशा प्रकारे पुढे चालू राहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असेही श्री.पवार म्हणाले.
समाजाच्या विविध पैलूना स्पर्श करणारी मराठा मंदिर संस्था : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,कोणतीही संस्था अनेक विषय घेवून काम करत असूनही या संस्थेचे काम उत्कृष्टरित्या सुरू आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मला माझे शालेय शिक्षण या संस्थेतून घेता आले याचा मला अभिमान आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेतांना स्कॉलरशिप देखील मराठा मंदिर कडून मला मिळाली. मला घडवण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६३ हजार जणांना उद्योगासाठी कर्ज वितरण करण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार नोकऱ्या देण्याचे घोषित केले आणि त्या दृष्टीने काम देखील सुरू झाले आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत असेही ते याप्रसंगी म्हणाले.
मराठा मंदिरने मला घडवले : उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,या संस्थेच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण घेतले. राजकीय विद्यापीठ देखील याच व्यासपीठावरून मार्गदर्शन मिळाले. वयाच्या २८ व्या वर्षी मी विधानसभेत निवडून गेलो. मराठा मंदिरच्या माध्यमांतून अनेक विद्यार्थी घडले. मराठा मंदिर मुळे आज मी या क्षेत्रात आहे आणि याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागातील मराठा मंदिर अनेक उत्कृष्ट विद्यार्थी घडवत आहे खरोखरच खूपच अभिमनाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी मराठा मंदिर रत्नागिरी हायस्कूल च्या “राखेतून उडाला मोर” या राज्यस्तरीय बालनाट्य पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक संतोष गारडी, लेखक डॉक्टर संतोष साळुंखे आणि विद्यार्थी व कलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मराठा मंदिरच्या स्मरणिकेचे व अस्मिता महाराष्ट्राच्या ई-बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कै.शशीकांत पवार यांनी केलेल्या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलभा शशिकांत पवार यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.