औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्यो पैठण दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांचा हा दौरा आता वादात सापडला आहे. पैठणला शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, हा दौरा आणि सभा सध्या प्रचंड वादात सापडली आहे. त्यासा कारणीभूत ठरले आहे ते पत्र. राजकीय जाहीर सभेला शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन या पत्रातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे पत्र खोटे असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे सत्तास्थापनेनंतर दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून त्यांचा अधिकृत दौरा आला आहे. रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. शिंदे गटाने केलेल्या बंडात सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात आहे. पैठणच्या कावसानकर स्टेडियमवर मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी आठवड्याभरापासून तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षक यांनी हजर रहावे, अशा सूचना देणारे एक पत्रक व्हायरल होत आहे. या पत्रकावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची राळ उडवली आहे.
काही दिवसांपूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली होती. त्यांच्या या यात्रेला प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुद्धा मोठी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. म्हणजे, मुख्य शिवसेना आणि बंडखोर शिंदे गट यांच्यात या सभा आणि दौऱ्यावर प्रचंड घमासान सुरू आहे. त्यामुळे त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच एका पत्रामुळे वाद निर्माण झाला आहे.
बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्राने मोठा गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना उपस्थित राहण्याबाबतचे पत्र काढण्यात आले आहे. शिंदे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठीच हे पत्रक काढण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र आता या पत्राबाबत शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हे पत्रक बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. असे पत्र काढून व्हायरल करणे म्हणजे हा निव्वळ खोडसाळपणा आहे. हा आमच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचे जंजाळ यांनी म्हटले आहे.
कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांची पैठणमधील एक सभा राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यावेळी संदिपान भुमरे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते. भुमरे यांनी आदित्य ठाकरेंची पैठणमधील सभा आणि अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पैठणला मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित केली आहे. या सभेत मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार केला जाणार आहे.
दानवे यांनी आरोप केला आहे की, गतवेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ओढावला होता. आता तशी फजिती नको म्हणूनच की काय तालुक्यातील अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला बोलावण्यात येत आहेत, आता या बिचाऱ्या महिला चिखल तुडवत आपले काम सोडून पैठणला येतील. असे रिकामे उद्योग या भगिनींना सांगण्यापेक्षा त्यांचे मानधन वेळेत मिळेल, याकडे जास्त लक्ष देण्याची गरज या सरकारला वाटत नाही, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
CM Eknath Shinde Paithan Tour Letter Controversy Politics