मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीवेळी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटविण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. पहिल्यांदाच दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सावरकर जयंती साजरी करण्यात आली. या समारंभावेळी असताना महाराष्ट्रात सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
या वादावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या आमच्यासाठी वंदनीय आहेत. त्यांचा अनादर होणार नाही. दिल्लीतील अधिकाऱ्यांशी मी आताच बोललो आहे. यासंदर्भात ते खुलासा करणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/mieknathshinde/status/1662850548528455682?s=20
CM Eknath Shinde on Statue Controversy