सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा होणार की नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अर्जाला परवानगी मिळणार का, बंडखोर शिंदे गट मेळावा घेणार का, यासह विविध प्रकारच्या प्रश्नांची सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होत आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भाष्य केले आहे. ते सातारा दौऱ्यावर आहेत. शिवाजी पार्कवरील शिवसेना दसरा मेळाव्याला परवानगी मिळणार का, असा प्रश्न माध्यमांनी शिंदे यांना विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे.
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात केली. दरवर्षी या मेळाव्यात महत्त्वाच्या घोषणा केल्या जातात. हा मेळावा पक्षासाठी आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा असतो. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. यंदा मात्र, हा मेळावा विशेष चर्चेत आला आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी करुन बाहेर पडलेला शिंदे गट हा मेळावा घेण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते.
यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याची संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी आमदारांसोबत घेत मोठे बंड केले आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार आणि नगरसेवकांना घेऊन ते वेगळे झाले. त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आता आपलीच शिवसेना खरी असा शिंदे गटाकडून केला जात आहेत. यासाठीच आता शिवसेनेची शिवाजीपार्क येथील दसरा मेळाव्याची परंपरा शिंदे गटाला पूर्ण करायची आहे. यामुळे या दिवशी उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंना मेळावा घ्यायचा आहे. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु झालेली आहे. दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना आहोत असे शिंदे गटाला दाखवून द्यायचे आहे. यासोबतच मनपा निवडणुका देखील तोंडावर आहेत. येथूनच त्यांना मनपा निवडणुकांचे रणशिंग फुंगायचे आहे. आता दसऱ्याच्या दिवशी शिवाजीपार्क कोणाला मिळणार याची चर्चा सुरु आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेता आला नव्हता. अशा वेळी यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितले होते. शिवसेनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात त्यांनी याविषयावर भाष्य केले होते. कारण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंध होते. यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत. अशा वेळी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट पूर्ण प्रयत्न करेल, असे दिसते. त्यातच सध्या राज्यात शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळणार की नाही यावरुन राजकारण पेटले आहे. शिवसेनेने याबाबत मुंबई महापालिकेकडे रीतसर अर्जही केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही किंवा झाला तरी तो शिंदे गटाचा कि शिवसेनेचा अशा अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.
विशेष म्हणजे सध्या दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर बोलणे टाळले आहे. सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन राजकारण सुरु झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री काय म्हणणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेमध्ये त्यांना याबाबत एकवेळेस नाहीतर तीन वेळेस प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. अखेर दसऱ्याला आणखी वेळ आहे. त्याबद्दल वेळेनुसार निर्णय घेऊ असे म्हणत नेमके काय होणार हे सांगणे त्यांनी टाळले.
CM Eknath Shinde on Shivsena Dasara Melava Permission
Politics Rebel Shinde Group Uddhav Thackeray