नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये घडलेल्या मोठ्या बस दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. खासगी बसला भीषण आग लागून ११ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने जिल्ह्याधिकारी आणि आयुक्तांशी फोनवर बोलणे केले आहे.
या घटनेत ११ जणांचा मृत्यू तर ३८ जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचारात काहीही कमी पडू देऊ नका, अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. परंतू आता जे जखमी आहेत, त्यांना उपचार देण्याला प्राधान्य द्यावे, अशा सुचना मी दिल्या असल्याचे शिंदे म्हणाले. ही बस मुंबईकडून यवतमाळकडे जात होती. त्यावेळी एका टँकरला धडकल्यामुळे बसला आग लागल्याची घटना घडली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी असणाऱ्यांपैकी दोन ते तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्वत: महापालिका व पोलिस आयुक्त हजर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जखमींवरचा उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे, तर मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1578585997779955712?t=Q6CowTwnsQvfjIP-PEcZsw&s=19
CM Eknath Shinde on Nashik Bus Fire Accident