जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटानं गुवाहाटी गाठणं, काही दिवसांनी राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन करणं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं या घटनाक्रमाच्या धक्क्यातून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळच काय सर्वसामान्य जनताही सावरलेली नाही. त्यावेळी हे सगळे कसे काय घडले, याचे खुलासे आणि गौप्यस्फोट आता हळूहळू होऊ लागले आहेत.
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या गुवाहाटीपर्यंतच्या प्रवासाचं रहस्य काही प्रमाणात उलगडलं. गुलाबराव पाटील यांना गुवाहाटीला पोहोचविण्यासाठी सगळे कामाला लागले होते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांसह अनेकांची नजर होती. विमानाने, ट्रेनने आणि साध्या चारचाकीने सुद्धा शिंदे गटाच्या आमदाराला या शहरातून त्या शहरात जाताना हजारो नजरांचा सामना करावा लागत होता. अश्यात गुलाबराव पाटील यांना गुवाहाटीला आणणे आव्हानात्मक होते. याबद्दल एकनाथ शिंदे सांगतात की, इच्छाशक्ती असली की सारं काही शक्य होतं. जिद्द आणि चिकाटी आवश्यक आहे. गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यात ही जिद्द होती. मंगेश चव्हाण आणि गिरीश महाजन यांनी खूप प्रयत्न केले. आणि अखेर अॅम्बुलन्सद्वारे गुलाबराव पाटील यांना गुवाहाटीमध्ये पोहोचविण्यात आलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव यांना धक्का
ज्या दिवशी गुलाबराव पाटील गुवाहाटीत दाखल झाले, त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थेट गुवाहाटीत शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे कळल्यावर उद्धव यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार धक्का बसला होता.
सर्वांना एकनाथ शिंदे कळले
गुलाबराव पाटील गुवाहाटीत पोहोचले आणि त्यानंतर काहीच दिवसांत महाराष्ट्रात काय घडले, हे साऱ्या जगाला माहिती आहे. आणि तेव्हापासूनच या राज्यातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला एकनाथ शिंदे कोण आहेत, हे कळूनच चुकले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
CM Eknath Shinde on Gulabrao Patil Surat Fly away
Maharashtra Political Crisis Politics Minister Shivsena Rebel MLA Jalgaon