मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे काल सायंकाळी अचानक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहचले. त्यामुळे सर्वत्र चर्चांना जोरदार उधाण आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पवार यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यात कुठले महत्त्वाचे विषय होते, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, आता यासंदर्भात खुद्द पवारांनीच मोठा खुलासा केला आहे.
शरद पवार म्हणाले की, मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली, असे पवार यांनी म्हटले आहे.
CM Eknath Shinde NCP Sharad Pawar Politics