नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे हे सहकारी मंत्र्यांसह उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला गेले होते. मात्र, याच काळात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी शिंदे हे जिल्ह्यातील सटाणा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू असताना संपूर्ण मंत्रिमंडळ देवदर्शनाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. काल दिवसभरात अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपीट यामुळे राज्याच्या अनेक भागात शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीस आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्याशिवाय द्राक्ष, डाळींब या फळबागाही उद्धवस्त झाल्या आहेत. राज्यभरातूनच यासंदर्भात चिंता व्यक्त होत आहे. तर, विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. अखेर त्याची दखल घेत मुंबईमध्ये परतलेल्या शिंदे यांनी तातडीने नाशिक दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांच्या समवेत पालकमंत्री दादा भुसे हे आहेत.
सटाणा तालुक्यातील निटाणे, बिजोट, आखतवाडे यासह अवकाळी पाऊसग्रस्त भागाचा दौरा ते करीत आहेत. मुंबईहून थेट सटाणा येथे हेलिकॉप्टरने शिंदे व भुसे यांचे आगमन झाले आहे. सध्या ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त गावांचा पाहणी दौरा https://t.co/TOtXsDOgZt
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 10, 2023
CM Eknath Shinde Nashik District Tour