मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज अचानक भेट घेतली. राजभवनात शिंदे दाखल झाल्याने राज्यात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या दौऱ्यावर आहेत. त्यातच शिंदेंनी राज्यपालांची भेट घेण्याचे कारण काय, शिवाय शिंदे आणि राज्यपाल यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. पुढच्या आठवड्यात न्यायालयाकडून अंतिम निकाल दिला जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वातील मोठा गट भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करणार असल्याच्या मोठ्या चर्चा आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक राज्यपालांची भेट का घेतली, या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकात प्रचारात व्यस्त असताना शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेण्याने अनेकांच्या बुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आल्यानंतरच्या पर्याय आणि स्थितीवर शिंदे यांनी राज्यपालांशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. दोघांमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचेही राजभवनातील सूत्रांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. pic.twitter.com/6BoxUjYCMF
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 4, 2023
Cm Eknath Shinde Meet Governor Ramesh Bais ay Rajbhavan