मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून अधिकारक्षेत्रावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्डवॉर सुरू असतानाच आता पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याची माहिती आहे. ठाण्यातील एका रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यूप्रकरणी दादांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारत ‘तुमच्या जिल्ह्यात इतके मृत्यू कसे’ असा सवाल केला आहे. यामुळे दोघांमध्ये नवा वाद सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशापासूनच शिंदे गट नाराज आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील सावध पवित्रा घेऊन आहेत. त्यांच्या अधिकारांवर गदा येणार, त्यांना प्रकृतीचे कारण सांगून पदावरून काढणार, अशा वावड्या उठताहेत. तर कधीकधी मुख्यमंत्र्यांच्या वॉररूमविरुद्ध अजितदादांची प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट अशी स्पर्धा लागलेली दिसून येत आहे. हा सर्व घटनाक्रम शिंदे आणि त्यांच्या गटाला दुखावणारा ठरत असल्याची चर्चा आहे. त्यात आता दादांच्या रोखठोक सवालाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजितदादा यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल केला. अजितदादा यांनी जाब विचारताच एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले. वादाची ठिणगी पडल्याचे दिसताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा विषय थांबल्याची माहिती आहे.
बैठकीतच दिले सुनावून
मंत्रिमंडळातील मंत्र्यांची शुक्रवारी एक खासगी बैठक झाली. त्यावेळी राज्यातील विविध प्रश्न, योजना आणि निर्णयावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असेही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही सविस्तर माहिती देत मृत्यूमागील कारणे दिलीत. मुख्य म्हणजे या दोघांमधील वाद वाढू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सावरते घ्यावे लागले.
CM Eknath Shinde Maharashtra Politics Ajit Pawar
Mumbai Thane Hospital Patient Death