मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडेबोल सुनावले आहेत. “मी सतत टिका करत बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता?” असा सवालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी वाचाळवीर मंत्री आणि आमदारांना विचारला आहे.
शिंदे गटाचे वाचाळवीर मंत्री आणि आमदार हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. मंत्री तानाजी सावंत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच अनेक आमदार टीका करताना वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. या बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांना आवर घालण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी खडेबोल सुनावले आहेत. नुकतीच शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्री आणि आमदारांवर नाराजी व्यक्त केली. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत कान टोचले आहेत. पक्ष चिन्हाबाबत विनाकारण भाष्य करु नका. वादग्रस्त वक्तव्य करु नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना केल्या आहेत.
शिंदे गटाचे मंत्री, आमदार हे सातत्याने विरोधकांवर, विशेषत: शिवसेनेवर टीका करताना दिसून येत आहेत. यामुळे त्यांनी केलेली वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिंदे गटातील मंत्र्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळ बैठकीतच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना खडेबोल सुनावले होते.
अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस चांगलेच संतापले. थेट मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी सत्तार यांना खडसावले होते. आता मुख्यमंत्र्यांनीही या आमदारांचे कान पिळले आहेत. त्यामुळे आतातरी आमदार बेजबाबदारपणे बोलणार नाहीत, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
CM Eknath Shinde Group Ministers and MLA’s Politics
Shivsena Rebel