नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी पंतप्रधान भेटीची माहिती दिली. ते म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती. यावेळी माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत होतं. पंतप्रधानांना भेटल्याचं आनंद आणि समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर होता. पतंप्रधानांनी नातवासोबतही खूप गप्पा मारल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे हे सहकुटुंब आज सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश असे सर्वजण उपस्थित होते. या भेटीत पंतप्रधानांना इर्शाळवाडी दरड दुर्घटना, राज्यातील पावसाची स्थिती, रखडलेले प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी पंतप्रधांनांनी रडखडेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन मोदींनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत मुंबईतील धारावी प्रकल्पावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. अधिवेशनाच्या काळात पंतप्रधान मोदींसोबत खासदारांच्या कौटुंबिक भेटी होत असतात. त्यात ही भेट असल्याचे भेट असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ७ जनकल्याण या निवासस्थानी ही भेट झाली. आज सायंकाळी ४ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही शिंदे हे भेट घेणार आहेत.
या कौटुंबिक भेटीची चर्चा
मुख्यमंत्री शिंदे यांची पंतप्रधान मोदींसोबत आठवड्याभरातील ही दुसरी भेट आहे. चार दिवसापूर्वीच एनडीए बैठकीला ते उपस्थितीत होते. तर, काल रात्री शिंदे हे अचानक मुंबईहून दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर आज ही भेट झाली. एकीकडे राजकीय गदारोळ चालू असतांना ही भेट झाल्यामुळे त्याची चर्चाही रंगली आहे.
भेटीनंतर शिंदे म्हणाले
देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली.
शिंदे पुढे म्हणाले की, धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली. कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.