मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात तीन महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होऊन शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या साथीने सरकार स्थापन झाले. या तीन महिन्यातच शिंदे गट आणि भाजप यांच्यातील सुंदोपसुंदी काही लपून राहिलेली नाही. त्यातच आता उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचा भक्कम दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आता खळबळजनक विधाने केली आहेत. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार आहे. कारण, विरोधकांबरोबरच खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. कारण एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांचा वेळ आमदारांना समजविण्यात तथा मनधरणी करण्यात जात आहे. त्यामुळे त्यांना गरज नसतानाही ठिकठिकाणी दौरे करावीे लागत आहेत. सभा-मेळावे घ्यावे लागत आहेत. शिंदे गटामध्ये भाजपचेच पदाधिकारी व कार्यकर्ते जात असल्याने मोठे आश्चर्य वाटत आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच भाजपला खिंडार पाडत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. इतकेच नाही तर भाजपामुळेच हे सरकार कोसळेल. हे सरकार फार दिवस टिकणार नाही, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही मत आहे. तसेच भाजपाचे गणित बसल्यानंतर शिंदे सरकार कोसळेल असेही पाटील यांनी ठासून सांगितले आहे. तसेच फडणवीस हे ज्यादिवशी सरकार बरखास्त करतील. तेव्हा आपण किती मोठी चूक केली आहे, हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पाटील यांनी स्पष्ट केले की, शिंदे गटात बरीच अस्वस्थता आहे. अनेक आमदार नाराज आहेत. त्यांना मंत्रीपदाचा शब्द दिला आहे. आणि तो न मिळाल्याने त्यांची धूसफूस सुरू आहे. तर, मुख्यमंत्री पद न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही शिंदे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. मंत्रीमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस झाले तरीही जिल्ह्यांना पालकमंत्री देण्यात आलेला नाही. काही मंत्री नाराज आहेत म्हणून त्यांनी अद्याप मंत्रीपदाची सूत्रेही हाती घेतलेली नाहीत. त्यांना जो विभाग मिळाला आहे, त्यावरुन ते नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्तारालाच च दोन महिने लागले आता पालकमंत्री नियुक्तीसाठी कदाचित पाच ते सहा महिने लागतील, असा टोलाही मुंडेंनी लगावला आहे.
CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis Politics
NCP Claim Jayant Patil