नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्ता स्थापन होऊन ३८ दिवस होत आले तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी करणारे तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच गोची झाली आहे. परिणामी, शिंदे गटात खुपच अस्वस्थता आहे. आताही दिल्लीचे बोलवणे त्यांना आले आहे. तब्ब्येत बरी नसल्याने घरुनच काम करणारे शिंदे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीला निघाले आहेत. सत्ता स्थापनेपासून त्यांची ही सहावी दिल्लीवारी आहे.
राज्यात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या नेतृत्वाखालीच नवीन सरकार अनेक निर्णय घेत आहेत. यामुळे विरोधकांकडून टिकेची झोड उठत असून नागरिकांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत आणि उलट सुलट चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे इच्छुक असलेले शिंदे गटातील आमदार आणि भाजपचे आमदार जणू काही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. परंतु त्यांच्याही अपेक्षा अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून देखील नव्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. अखेर आता लवकरच मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळण्याची दाट शक्यता आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळाबाबत सर्व वाटाघाटी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता फडणवीस आणि शिंदे महाराष्ट्रात परतताच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या २-३ दिवसांत कॅबिनेटचा विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विस्तारासाठी काहीही भाष्य केलेले नाही त्यामुळे विस्तार कधी होणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबाला एकनाथ शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता कारणीभूत आहे. खातेवाटप वाद हा दुय्यम आहे परंतु खरी बाब म्हणजे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे.
विशेष म्हणजे मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची याबाबतची यादी भाजपाने फायनल केली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मंत्रिमंडळात नवे चेहरे दिसण्याची शक्यता अधिक आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी अशी भाजपाच्या पक्षक्षेष्ठींची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदा भाजपाकडून काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यात परतताच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रेबाबत अद्याप सुप्रीम कोर्टाकडून निकाल येणे बाकी आहे. सोमवारी त्याबाबत सुनावणी आहे. त्यामुळे देखील निकाल रखडल्याचे बोलले जात आहे. आता राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे – फडणवीस या जोडगोळीचे सरकार आले आहे. परंतु त्यावर भाजपच्या दिल्लीतील पक्ष श्रेष्ठीचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक निर्णय दिल्लीतच होतात, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. काल शुक्रवारी देखील त्यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे काल पाचव्या वेळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी दिल्लीत अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा सवाल विरोधकांकडून रोज त्यांना विचारण्यात येत आहे. यावर आता तरी या भेटीनंतर तरी मंत्रिमंडळ विस्ताराला नवा मुहूर्त मिळून राज्याला नवे मंत्रिमंडळ होणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने विरोधकांकडून नव्या सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे हजारो लोकांवर स्थलांतरणाची वेळ आली. शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत राज्याला मदतीची आवश्यकता असताना मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis Delhi again Visit