मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेला शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या राज्यातील सत्ता स्थापनेला १०० दिवस होत नाही तोच बेबनावच्या वार्ता येऊन धडकल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही तरी बिनसले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच दोघेही एकाच जाहीर कार्यक्रमाला हजर राहत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर त्याचा काही परिणाम होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
राज्यात यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत होते. त्यामुळे तीन पायांची शर्यत किंवा तीन चाकाची रिक्षा असा उपरोधिक उल्लेख या सरकारचा करण्यात येत असे. तसेच या तिन्ही पक्षांमध्ये एकमत नसल्याने सरकार व्यवस्थित चालत नाही, असा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार सांभाळत आहेत. शिंदे-फडणवीस त्यांच्या सरकारला आता १०० दिवस उलटले असून त्यांनी अनेक घोषणांचा धडाका लावला आहे. मात्र दोघांमध्ये काहीतरी बेबनाव झाल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी तर शिंदे हे फडणवीस यांच्यावर नाराज तर फडणवीस हे शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. परंतु त्याचा प्रत्यय आला नव्हता, मात्र आता ठाणे येथील एका कार्यक्रमात दोघांनाही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दोघांनाही आमंत्रित केले असताना हे दोघेही एकाच वेळी व्यासपीठावर उपस्थित नव्हते, तर एकापाठोपाठ एक या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्यात बेबनाव आहे, असे म्हटले जाते. अर्थात अद्यापही याबाबत स्पष्ट किंवा ठोस पुरावा मिळू शकला नाही. मात्र या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे, असे दिसून येते.
इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाच व्यासपीठावर येणे टाळले आहे. काल दिवसभर दोन्ही नेत्यांचे सोबत कार्यक्रम होते परंतु हे नेते एकमेकांसोबत कार्यक्रमात आले नाहीत. त्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील प्रभादेवी येथे शिंदे गट आणि शिवसेनेच्या झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
पैठण येथील सभा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना फडणवीसांच्या नाराजी चर्चेवरही भाष्य केले होते. फडणवीस आणि मी एकसे भले दोन आहोत. आणि आम्ही दोघे दो दिल एक जान आहोत. एवढे लक्षात ठेवा. कारण, फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा अनुभव आहे. आता ते उपमुख्यमंत्री आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांनी आदेश दिल्या नंतर त्यांनी तो मानला. हा आदर्श आहे. एक मोठे उदाहरण आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीसांचे कौतुकही केले होते.
रविवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत फडणनीस यांनी शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वादावर चर्चा केली असे म्हटले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमके काय सुरू आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे म्हणजे रविवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी दिवसभर एकत्रित दौरा असूनही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच व्यासपीठावर येणे टाळले होते.
विशेष म्हणजे ठाण्यात दिवसभरात तीन कार्यक्रम एकत्रित होते. मात्र एकाही कार्यक्रमाला दोघे एकाच वेळी एकमेकांसमोर आले नाहीत. तसेच राजभवनावरील कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे गेले नाहीत, त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस देखील ठाण्यात आले होते, तेथे भागवत कथा आणि बंजारा समाजाच्या कार्यक्रमाला फडणवीस आले असताना शिंदे या कार्यक्रमाला येतील अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु फडणवीस या कार्यक्रमात होते तोपर्यंत शिंदे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यानंतर मात्र ते दोन्ही कार्यक्रमांना आले, याची चर्चा सुरू आहे.
मागील आठवड्यात देखील मीरा भाईंदर येथील कार्यक्रमात असाच प्रकार घडला होता दोघे एकाच वेळी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, दोघांमध्ये नाराजीचे कारण म्हणजे मिरा भाईंदर येथील महापालिका आयुक्त यांचे प्रकरण तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी दोघांमध्ये मतभेद झाल्याने वाद निर्माण झाल्याचे देखील सांगण्यात येते, परंतु याबाबत अध्यक्ष स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.
CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis
Politics BJP Rebel Shivsena