मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामाची ते आज पाहणी करीत आहेत. वर्धा, वाशिम, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमधील महामार्गाची सद्यस्थिती त्यांनी आज जाणून घेतली. मुख्यमंत्री शिंदे हे शिर्डीपर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शिर्डीहून ते परस्पर दिल्लीला रवाना होणार आहेत.
समृद्धी महामार्गाचे उदघाटन येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर ते शिर्डी या टप्प्यातील महामार्गाची आज पाहणी करीत आहेत. ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यात शाही समारंभात ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करतील. देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो आता पूर्णत्वास आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समृद्धी महामार्गाचे उदघाटन करण्यासाठीचे निमंत्रण देण्यासाठी ते जात असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्रीपद स्विकारल्यापासून शिंदे यांनी अनेक वेळा दिल्लीवारी केली आहे. आताही ते शिर्डीहून दिल्ली गाठणार आहेत. दिल्लीत ते काही नेत्यांच्या गाठीभेटीही घेणार असल्याचे सांगितले जाते.
CM Eknath Shinde Delhi Tour Via Shirdi