अयोध्या (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्या येथे ‘प्रभु श्री रामचंद्रा’च्या जन्मस्थळी दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आज अयोध्येत आगमन झाले असून यावेळी उभयतांचे शहरात मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अयोध्येतील मंदीरात ‘प्रभु श्री रामचंद्रांचे’ दर्शन घेतले तसेच यावेळी झालेल्या महाआरतीत सहभागी झाले. यानंतर अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिर परिसराला मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून मंदीराच्या बांधकामाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील , ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे , अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यासोबत खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.
हे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, अयोध्येत महाराष्ट्र भवन साकारले जाणार आहे. ते अत्याधुनिक आणि विविध सोयी-सुविधांनी संपन्न असेल. या भवनाला वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच, विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही त्यांनी जोरदार उत्तर दिले.
मुख्यमंत्री श्री शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभु श्री रामच्रंद्राच्या जन्मस्थळी दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची माहिती दिली. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी यांना निवेदन दिले असल्याची माहितीही श्री शिंदे यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे घेतलेल्या निणर्यांची माहिती येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले.
अयोध्येतील वातावरण भारावलेले असून राम मंदिराच्या गर्भ गृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिरांचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुर्ण होईल, असे ते म्हणाले.
तत्पुर्वी मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभु श्री रामचंद्रच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. त्यांनी मंदीर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी राज्याचे मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
अयोध्या, उत्तर प्रदेश येथे आयोजित पत्रकार परिषदेतून लाईव्ह https://t.co/F9to8hWmla
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023
CM Eknath Shinde Big Announcement in Ayodhya