मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यापूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी सरकारचे बहुमत मोठे आहे. विरोधकांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर अधिवेशनात दुरुपयोग करणार का, असा प्रश्न विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही लोकहिताचे निर्णय घेऊ. बहुमताचा कुठलाही दुरुपयोग करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गट आणि भाजप यांच्या साथीला आता अजित पवार यांच्या नेतृत्वातील आमदारांचा मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे आता विरोधकांची संख्या अत्यल्प आहे. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार का टाकला हे कळाले नाही. यावेळी फडणवीस म्हणाले की, मी पहिल्यांदाच पाहतो आहे की, विरोधी पक्षांना विषयच माहित नाही. विरोधकांना चोख उत्तर देऊ. बहुमताचा कुठलाही दुरुपयोग केला जाणार नाही. विविध विकास कामांचे प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत. महाराष्ट्राला सर्व दृष्टीने पहिल्या क्रमांकावरचे राज्य बनवायचे आहे. मोठी गुंतवणूकही आणायची आहे. त्यादृष्टीने आणि अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी हे अधिवेशन अधिक महत्त्वाचे आहे, असे फडणवीस आणि पवार यांनी सांगितले.