मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती ती अखेर पूर्ण झाली आहे. मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची विशेषतपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी केली जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. या समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई महापालिके मध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरीक्षण अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या तत्कालिन मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होणार आहे. शिंदे यांचा हा निर्णय ठाकरे गटाला अडचणीत आणणारा असल्याचे बोलले जात आहे.