मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात आधीचे अडीच वर्षे राज्य करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारने सर्व लोकोपयोगी विकासकामांच्या प्रकल्पांना ब्रेक लावला होता. मात्र आम्ही सत्तेत येताच, हे सगळे स्पीड ब्रेकर दूर करून विकासकामांना गती दिल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यामुळेच आज आपले राज्य पायाभूत सुविधा आणि परकीय गुंतवणुकीत देशात क्रमांक एकवर असल्याचे सांगितले.
कुर्ला येथे महायुतीचे उमेदवार महेश कुडाळकर यांच्यासाठी घेतलेल्या पहिल्या प्रचार सभेत बोलतांना ते म्हणाले की, मुंबईत आज अनेक ठिकाणी पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. आम्ही रमाबाई आंबेडकर नगर मध्ये १७ हजार घरांचा प्रकल्प मार्गी लावला असून मुंबई पोलीस, गिरणी कामगार, सफाई कामगारांना घरे मिळवून देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आल्यास या परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न नक्की सोडवू असे याप्रसंगी स्पष्ट केले. शहरातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी नक्कीच दूर होईल असे मत यासमयी व्यक्त केले.
लाडक्या बहिणींना आधार देणारे आपले सरकार असून माझ्या लाडक्या बहिणींनी साथ दिली तर ही रक्कम अधिक वाढवू मात्र ही योजना काही मंडळींच्या डोळ्यात खुपते आहे. त्यामुळे त्यांनी ती रद्द करण्यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे. या योजनेत खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणी नक्की जोडा दाखवल्या शिवाय राहणार नाहीत असे मत त्यांनी व्यक्त केले. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होत असून खरे फटाके दिवाळीनंतर फुटणार असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी सांगितले. येत्या २० तारखेला मतदान झाल्यानंतर खरा ऍटम बॉम्ब २३ नोव्हेंबर रोजी महायुतीचा महाविजय होईल तेव्हा फुटेल असे मत व्यक्त केले.