मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेश चतुर्थीच्या पवित्र दिनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. या प्रसंगी पत्नी सौ.लता शिंदे, पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ.वृषाली शिंदे, नातू कु.रुद्रांश आणि वर्षा निवासस्थानी कर्तव्य बजावणारे पोलीस आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राज्यातील जनेतला सुखी, समाधानी, आनंदी ठेव एवढेच मागणे श्री गजाननाच्या चरणी मागितले. तसेच यंदा पाऊस चांगला झाला असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे, तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असली तरीही त्या शेतकऱ्यांचा पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे. आजपासून राज्यात गणेशोत्सव सुरू झाला असून सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांना हा सण सुखाचा जावो यासाठी शुभेच्छा दिल्या.
श्री गणेशाच्या आशीर्वादाने राज्यातील महायुती सरकार पायाभूत सुविधा आणि लोककल्याणकारी योजना यांची सांगड घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी काम करत आहे. राज्यात अनेक उद्योग आले असून त्यातून हजारो हातांना रोजगार मिळणार आहे. परदेशी गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक परदेशी गुंतवणूक राज्यात झाल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले.