नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सिंगापूर दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत. नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी या दौऱ्याला परवानगी नाकारली आहे. अरविंद केजरीवाल यांना १ ऑगस्ट रोजी एका परिषदेत सहभागी होण्यासाठी सिंगापूरला जायचे होते. आवश्यक प्रक्रियेअंतर्गत, दिल्ली सरकारने नायब राज्यपालांकडे मंजुरी मागितली होती, परंतु ही फाईल बराच काळ प्रलंबित होती.
नायब राज्यपाल कार्यालयाच्या वतीने फाईल फेटाळल्याबाबत म्हटले आहे की, सिंगापूर परिषद महापौरांची आहे. मुख्यमंत्र्यांनी तेथे जाण्याचे कोणतेही औचित्य नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या प्रवासाला परवानगी देण्याची मागणी आम आदमी पक्ष सातत्याने करीत होता. केजरीवाल हे सिंगापूर परिषदेत शिक्षण आणि आरोग्याबाबत दिल्लीत केलेल्या कामांची माहिती देतील, त्यामुळे देशाची मान वाढेल, असा युक्तिवाद आपने केला होता.
नायब राज्यपालांनी प्रस्ताव नाकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की नायब राज्यपालांनी त्यासाठी दिलेल्या कारणाशी ते सहमत नाहीत. मुख्यमंत्र्यांना हे वैयक्तिक निमंत्रण आहे. सिंगापूरला जाण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही चुकीच्या परंपरेची नांदी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
CM Arvind Kejriwal Singapore Tour LG Rejected Proposal