मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. यावेळेस या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या मुंबईतीत निवासस्थानी गेले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोघांमध्ये सव्वा सात चर्चा झाली. या भेटीत भाजपच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदाराची मनसेला ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे विधानपरिषदेचे आमदार होऊ शकतात अशी चर्चा रंगली. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती समोर आली.
ही सर्व चर्चा सुरु असतांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीमागील कारण सांगितले. ते म्हणाले की, चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितले होतं, मी घरी येईन. त्यामुळे आज मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला, आणि मग तिथून मी निघालो, आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होता, असे त्यांनी सांगितले.