विशेष प्रतिनिधी, मुंबई /यवतमाळ / नाशिक :
एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली, आता अशाच प्रकारे महाराष्ट्र पोलीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करुन कारवाई करेल काय ? याबाबत राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी देखील अशीच भाषा पूर्वी एका भाषणात वापरली होती. त्यामुळे आता भाजपच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या ‘ विधाना विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. प्रथम तक्रारदार व भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा त्यांनी शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची आणि स्फोटक भाषणे केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून भाजप नेत्याकडून तक्रार अर्ज आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, दि. २५ ऑक्टोबर २०२० रोजी दस-याला भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात ‘आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळी “ठाकरे म्हणाले होते की, योगी मुख्यमंत्री कसे बनू शकतात? त्याने जाऊन एका गुहेत बसावे. या योगींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. योगींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना चपला काढल्या नाहीत, त्यामुळे योगी जेव्हा महाराष्ट्रात येतात, तेव्हा त्यांना चप्पलाने मारले पाहिजे. ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे समाजात अशांतता आणि दंगली होऊ शकतात, असे या तक्रारीत म्हटले आहे. भुतडा म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात भाजपच्या वतीने आम्ही महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल करणार आहोत.
दरम्यान, नाशिकमधील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, भाजपच्या नाशिक महानगर शाखेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांच्यासह इतर जणांविरोधात तक्रारी अर्ज पोलिस आयुक्तांकडे दिला आहे. सामनाच्या संपादकाने सामनामध्ये नारायण राणेंबद्दल लिखाण केले, हा राणेंचा अपमान आहे. तसेच आमदार पुढे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल म्हणाले होते,” हे योगी नाहीत, भोगी आहेत, या योगींना चप्पलाने मारले पाहिजे. ” असे बोलणे योग्य नाही. म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी आम्हाला आशा आहे. दरम्यानच्या काळात, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून अटक झाल्यानंतर भाजपच्या वतीने हा अर्ज देण्यात आला आहे. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून जाताना जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर अटकेनंतर रायगड जिल्ह्यात महाड येथे कोर्टात आणण्यात आले होते. कारण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तीव्र निदर्शने केली. तसेच महाडमध्ये ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.