इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. तीन आठवड्यांपासून तो फरार होता. सीआयडी आता त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन २२ दिवस उलटले आहे. या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातही त्याची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडाचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळे आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही.
ते पुढे म्हणाले की, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वासन दिले आहे की, तुम्ही काळजी करु नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल याबाबत सगळी माहिती पोलिस देतील. ते पोलिसांचे काम आहे. पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1874031919635333339