नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे ओझर विमानतळावर स्वागत केले. त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमी मध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्याचा दौरा असल्याने नाशिक पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे. नाशिक शहरात ठिकठिकाणी अत्यंत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पांचे उदघाटन झाल्यानंतर सर्व मुख्यमंत्री मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. या सोहळ्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मंत्री सुध्दा उपस्थिती झाले आहेत. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये पोलिस उपनिरीक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. एमपीएससी परीक्षेद्वारे जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांना या अकादमीत खडतर प्रशिक्षण दिले जाते. हेच अधिकारी पुढे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सज्ज होतात. या अकादमीत काही प्रकल्प साकारण्यात आले आहेत. त्यात नवनिर्मित इनडोअर फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक, अॅस्ट्रो टर्फ फुटबॉल मैदान, अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टॉपिंग हॉलिबॉल, बास्केटबॉल मैदान तसेच निसर्ग नावाचे नूतन नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्प यांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, आमदार सरोज आहेर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुष्प देऊन स्वागत केले.